हे आहेत नवरस. कोणत्याही साहित्यातकृतीतील, कोणत्याही माध्यमातील. कोणत्याही साहित्यकृतीचा आनंद घेताना त्यातून होणारी रसनिष्पती सर्वांत महत्त्वाची असते.
काव्य मग ते कसेही असो श्राव्य, दृक्श्राव्य, दृश्य, त्यांमध्ये रस हाच मूलभूत घटक असतो.
कोणताही वाचक, प्रेक्षक एखादी कलाकृती वाचतो, पाहतो, ऐकतो थोडक्यात तिचा अनुभव घेतो तेव्हा त्यातून होणारी रसनिष्पत्ती त्याच्यासाठी महत्त्वाची असते. साहित्यामध्ये लेखकाने या रसांचे विविध भाव वापरलेले असतात ज्यांच्यायोगे वाचकाला रसाची अनुभूती येते. त्यासाठी लेखक शब्द, शैली, अलंकार अशा साधनांचा वापर करत असतो. रति, उत्साह, शोक, आश्चर्य, हास, भय, जुगुप्सा, क्रोध, निर्वेद हे कोणत्याही व्यक्तीच्या मनात असणारे या नवरसांचे स्थायी भाव. समोर येणाऱ्या आशयामुळे हे स्थायी भाव जागृत होतात आणि वाचकाला या रसांचा आनंद घेता येतो.
अनुवाद आणि रस यांचं नातं तसं पाहता गुंतागुतीचं आहे. मूळ लेखकाने ज्या तीव्रतेने रसाची अभिव्यक्ती केलेली आहे तितक्याच तीव्रतीने अनुवादकानेही तो रस चित्रित करावा ही मूलभूत आणि सार्थ अपेक्षा आहे. हीच अपेक्षा एका चांगल्या अनुवादाच्या निकषांवर खरी उतरते.
पण हे करत असताना ज्या लक्ष्य भाषेमध्ये ते साहित्य अनुवादित होणार आहे त्या भाषेतील वाचकांच्या अभिरुचीचा विचार केला जावा का, हा मुद्दा लक्षात घेणेही महत्त्वाचे आहे. खासकरून कादंबऱ्यांचा बाबतीत. उदा. मूळ लिखाणामध्ये जर शृङ्गार, बीभत्स अथवा रौद्र रस अतिरंजित असेल आणि ज्या वाचकांसमोर अनुवादित साहित्य आणायचे आहे त्यांच्या पसंतीस अशा अतिरंजित गोष्टी उतरत नसतील, अशा वेळेस अनुवादकाने काय करणे अपेक्षित आहेॽ
दृक्श्राव्य माध्यमांच्या बाबतीत आपण त्या रसाची तीव्रता कमी करू शकणार नाही पण जेव्हा वाचकांचा प्रश्न येतो तेव्हा अनुवादकाने मूळ शृंगारिक वर्णने किंवा हिंसक चित्रणाची अथवा बीभत्स चित्रणाची तीव्रता कमी करून ती सौम्य शब्दांत मांडावी काॽ असे केल्याने त्या मूळ लेखकाशी अनुवादकाची असलेली बांधीलकी धोक्यात येते काॽ हे सर्व प्रश्न विचार करण्याजोगे आहेत.
असे वाटते, शेवटी यातून असा सुवर्णमध्य काढता येणे शक्य आहे. जिथे आशयाची हानी होणार नाही आणि जेणेकरून मूळ कथानकास धक्का लागणार नाही अशा ठिकाणी लक्ष्य भाषेतील वाचकांच्या पसंतीस, अभिरुचीस उतरेल अशा प्रकारे अनुवादकाने त्या मूळ आशयाची तीव्रता कमी करावी. जेणेकरून वाचकाला मूळ साहित्यकृतीतील रसाचा अनुभवही घेता येईल आणि मूळ लिखाणाशी असणारी अनुवादकाची बांधीलकीही धोक्यात येणार नाही.