माणसांच्या प्रतिमा, घटना वगैरे जतन करण्यासाठी हजारो वर्षांपासून चित्रांची मदत घेतली जात होती. मग जेमतेम दोनेकशे वर्षांपूर्वी छायाचित्रकला म्हणजे फोटोग्राफीचा शोध लागला. साधारणपणे 1826-27 मध्ये जोसेफ नाईसफोर यांनी पहिलं छायाचित्र घेतल्याची नोंद सापडते. अर्थातच त्यावेळेस त्या तंत्राबद्दल खूप कुतूहल वाटलं होतं लोकांना. सुरुवातीच्या काळात छायाचित्रांत फक्त कृष्णधवल रंग दिसायचे. एक वेगळंच सौंदर्य होतं त्या काळ्यापांढऱ्या प्रतिमांमध्ये. माणसं, प्रसंग जास्त जिवंत झाल्यासारखे वाटायचे त्यात. कालांतराने छायाचित्रांना अनेक रंगांची साथ मिळाली. रंगांमुळे आठवणी आणखी ताज्या दिसू लागल्या. बदलत्या परिस्थितीनुसार कॅमेऱ्यांचे आकार बदलले. स्टुडिओत जाऊन फोटो काढणारे लोक स्वतःचे छोटे कॅमेरे बाळगू लागले. मधला एक काळ असा होता जेव्हा अगदी मध्यमवर्गीय घरांमध्येही एक रंगीत कॅमेरा हमखास दिसायचा. 32 किंवा 36 फोटोंची फिल्म भरायची आणि हौशी फोटोग्राफी करत सुटायचं हा अनेकांचा छंद होता. मग डिजिटल तंत्रज्ञान आलं. आणि आता तर काय मोबाईलमध्येच कॅमेरा असतो. त्यामुळे हवं तेव्हा हवी ती दृश्य टिपण्याची मुभा मिळते आपल्याला.
अर्थात हे झालं हौसेपुरतं. पण एक शास्त्र म्हणूनही फोटोग्राफीच्या विषयात शिकण्यासारखं खूप काही आहे. ॲपर्चर, आयएसओ आणि शटर स्पीड या तीन प्रमुख गोष्टी विचारात घ्याव्या लागतात. एक्स्पोजरचं म्हणजे प्रकाशाचं प्रमाण सांभाळावं लागतं. लेन्सेसचं तंत्र अवगत करावं लागतं. बरं नुसती ही तंत्रं सांभाळून छायाचित्र चांगलं येतं असं नाही. त्यात सहजता कशी दिसेल ते बघावं लागतं. छायाचित्र बोलकं असलं पाहिजे. समोरचं दृश्य वेगळ्या नजरेतून पाहण्याचं कसब असायला हवं. तर ते तसं इतरांना दाखवता येतं.
याशिवाय फोटोग्राफीच्या अनेक शाखा, नियम, नव्याने येऊ घातलेलं तंत्रज्ञान अशा अनेक गोष्टींची माहिती मिहिर टोकेकरांनी अवांतरच्या या सत्रामध्ये दिली. व्यावसायिक फोटोग्राफर म्हणून काम करताना अनेक प्रकारचे अनुभव येतात. कधीकधी खूप विचार करून काढलेलं वेगळं छायाचित्र समोरच्या माणसाला आवडतच नाही. लहान मुलांचे फोटो काढताना खूप संयम ठेवावा लागतो. असं बरंच काही यानिमित्ताने जाणून घेता आलं.
असंच नवनवीन काहीतरी जाणून घेण्यासाठी अवांतरमध्ये यायलाच हवं. तर मग पुढच्या अवांतर मध्ये येणार ना!
१८ एप्रिल, २०१८ रोजी आपल्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आम्ही घेऊन येत आहोत तो म्हणजे लेखक, अनुवादक आणि कॉपीराइट. याविषयी जाणून घ्यायला तुम्हाला नक्कीच आवडेल. म्हणूनच याविषयी बोलण्यासाठी आपल्याकडे येणार आहेत बौद्धिक संपदा क्षेत्रातील तज्ज्ञ ॲडव्होकेट आनंद बागवडे. तर मग अवांतरच्या पुढच्या सत्रासाठी १८ एप्रिल, २०१८ चा दिवस नक्की राखून ठेवा.